पालघर

पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी श्वान-निर्बीजीकरण केंद्रे; बोईसर व मनोर केंद्रांचे उद्घाटन, सफाळेला लवकरच सुरूवात

पालघर :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पालघरने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंदा बोईसर, मनोर आणि सफाळे या ठिकाणी स्वतंत्र श्वान-निर्बीजीकरण केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, यापैकी बोईसर केंद्राचे उद्घाटन काल तर मनोर केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले. सफाळे केंद्राची स्थापना लवकरच होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात यापूर्वी सलग दोन वर्षे सातपाटी, अर्नाळा, दांडी या समुद्रकिनारी भागात श्वान-निर्बीजीकरण तसेच रेबीज लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली होती. असा उपक्रम राबवणारी पालघर ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे.

या वर्षी प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शासनाच्या सूचनांनुसार केंद्र-आधारित प्रणाली सुरू झाल्याने श्वान संकलन, निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यानंतरची निगा ही प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित व परिणामकारक होणार आहे.

बोईसर येथे स्थापन केलेले पहिले केंद्र जिल्हा परिषद पालघर आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे.पोलिस गृहनिर्माण सोसायटी येथे ही केंद्र स्थापन करण्यात आले आहे. येथे श्वान संकलन, तीन ते चार दिवसांची निगा, शस्त्रक्रिया आणि रेबीज लसीकरण ही प्रक्रिया प्रशिक्षित तज्ञांकडून केली जाते. शस्त्रक्रियेनंतर श्वानांना आवश्यक उपचार देऊन त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, ग्रामपंचायत अधिकारी कमलेश संखे,सरपंच दिलीप धोंडी, उपसरपंच नीलम संखे तसेच इतर सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

त्याच धर्तीवर जिल्हा परिषद पालघर आणि नवसमाज निर्माण बहु उद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज मनोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये केंद्राची स्थापना करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर, संस्थेचे प्रकल्प संचालक गौतम शिरसाठ ग्रामपंचायत अधिकारी नितीन पवार, सरपंच चेतन पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.नाजीम खतीब यांनी यासाठी नियमित पाठपुरावा केला असल्याचे यावेळी हसनाळकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button