नशेच्या झळांनी घर पेटले, मुलाच्या हातून वडील संपले!

ज्ञानेश्वर रामोशी
पालघर : वडील दारू पिऊन सातत्याने घरात भांडण आणि आईला, भावंडाना मारहाण करायचा, नेहमीच होणाऱ्या या वादामुळे गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास झालेल्या कौटुंबिक मारहाणीतून हा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेरीचा पाडा येथे भगवान नवसू बर्तन (वय 45 वर्षे) आणि त्याचे कुटुंबीय राहते.
भगवान हा गुरुवारी दहा वाजताच्या सुमारास दारू पिऊन घरात आला. त्यानंतर भगवान यांनी पत्नी सुनंदाशी भांडण सुरू केले. या भांडणाच्या वादातून भगवान यांनी सुनंदा आणि त्यांच्या भावंडांना मारहाण करायला सुरुवात केली. भगवान याचा सोळा वर्षी अल्पवयीन मुलगा हा भांडण सोडवण्यासाठी गेला होता. त्यावेळी वडील भगवान यांनी त्याचा गळा आवळला.वडील दारू पिऊन सातत्याने घरात भांडण आणि आईला, भावंडाना मारहाण करतो, हा राग मनात ठेवून या अल्पवयीन मुलाने घरात असलेल्या लाकडी मुसळीने भगवान याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या घटनेमध्ये भगवान याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना ही घटना कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. गावचे पोलीस पाटील भिवा मेंगाळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भगवान याच्या अल्पवयीन मुलावर खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज भिवंडी येथील बालसुधार गृहात पाठवले आहे, असे मोखाडा पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले करीत आहेत.

