भाजी बाजारातील ज्वेलर्सच्या दुकानात बोगदा खोदून दरोडा; सुरक्षा रक्षकावर संशयाची सुई!

पालघर : पालघर शहरातील मुख्य भाजी बाजारात थरारक चोरीची घटना घडली आहे. अंबर शॉपिंग मॉलमधील एका प्रसिद्ध नाकोडा ज्वेलर्स दुकानात चोरट्याने शेजारच्या दुकानातून बोगदा खोदत प्रवेश करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
या धाडसी चोरीनंतर इमारतीतील सुरक्षा रक्षक गायब झाल्याने त्याच्यावरच संशयाची सुई वळली आहे.ही घटना शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.
चोरट्याने प्रथम शेजारच्या कपड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तेथून थेट ज्वेलर्सच्या दुकानापर्यंत बोगदा तयार केला. त्यानंतर दुकानातील तिजोरीचे कुलूप तोडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटा फरार झाला.
घटनास्थळी तपासासाठी पालघर पोलिसांचे पथक दाखल झाले असून, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तारा कापलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. पोलिसांनी ठिकाणाहून बोटांचे ठसे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. चोरी गेलेल्या सोन्याचे अचूक मूल्य अद्याप निश्चित झालेले नसले तरी नुकसान मोठ्या प्रमाणावर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.या घटनेमुळे भाजी बाजार परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी आपापल्या दुकानांवर नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा रक्षकाचा काहीही ठावठिकाणा न मिळाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, तपास वेगाने सुरू आहे.

