रिस्पॉन्सिव कारखान्यातील भीषण आगीत जखमी झालेल्या कामगारांपैकी दोघांचा मृत्यू

बोईसर :- “तारापूर औद्योगिक वसाहतीतील ‘रिस्पॉन्सिव’ या कारखान्यात मागच्या आठवड्यात शुक्रवारी दुपारी उत्पादन सुरू असतानाच अचानक लागलेल्या भीषण आगीत पाच कामगार होरपळले होते. त्यात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर जखमींपैकी तीन कामगारांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं, तर दोघांवर बोईसरमध्ये उपचार सुरू होते.
”भाजलेल्या पाच कामगारांपैकी अक्षय कुमार या तरुणाचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला, तर विजय रविदास या कामगाराचाही दोन दिवसांनी दुर्दैवी अंत झाला आहे.
“या कारखान्यात पूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी एका कामगाराचा अंगावर लोखंडी रॉड पडून मृत्यू झाला होता.
कामगारांच्या मते, व्यवस्थापन कमी पगारात कंत्राटी पद्धतीने अकुशल कामगारांना कुशल कामगारांच्या जागी कामावर लावतं — आणि त्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत.”“सुरक्षेच्या नियमांकडे सातत्याने होत असलेलं दुर्लक्ष आता जीवावर उठलं आहे.तारापूरसारख्या औद्योगिक भागात कामगारांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलली नाहीत, तर अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

