चरस विक्री करणाऱ्या आरोपीवर तलासरी व घोलवड पोलिसांची संयुक्त कारवाई
१२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ज्ञानेश्वर रामोशी
पालघर :- जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत आणखी एक यश मिळाले आहे. तलासरी व घोलवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चरस विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून तब्बल १२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील चिखला बीच परिसरात एक इसम चरस विक्रीसाठी येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार तलासरी व घोलवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सापळा रचला. पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास काळ्या रंगाच्या CB Shine (MH48-AD-2456) या दुचाकीवर संशयित इसम येताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव सायमन जेत्या वळवी (वय ४०, रा. कैनाड कडुपाडा, ता. डहाणू) असे सांगितले.तपासादरम्यान संशयिताच्या दुचाकीच्या हँडलजवळील प्लास्टिक पिशवीत ६०० ग्रॅम चरस (किंमत सुमारे १२ लाख रुपये) सापडला. तसेच मोबाईल आणि दुचाकीसह एकूण १२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४४/२०२५ नोंदवण्यात आला असून एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(II) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि साहेबराव कचरे (घोलवड पोलीस ठाणे) करत आहेत.सदर कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, व उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोनि अजय गोरड, सपोनि साहेबराव कचरे, तसेच तलासरी व घोलवड पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

